प्रेषित


यावर्षी वाचून आवडलेलं हे दुसरं थरारक पुस्तक. खरं तर ही एक विज्ञानकथा आहे. पण प्रत्येक पानागणिक आपली उत्कंठा वाढवणारे आहे. सदतीस वर्षांपूर्वी ही कथा लिहिली आहे यावर विश्वासच बसत नाही. आपल्या काळाच्या मानाने लेखकाचे विचार व कल्पकता कितीतरी पुढे होती याची जाणीव हे पुस्तक वाचताना होते.एक वैज्ञानिक, प्रिंगल, अवकाशात अजून कुठे जीवसृष्टी आहे का याचा शोध लावतोय. ते सुद्धा लपून छपून मिलिटरीच्या यंत्रणेने. एका अपघातात त्याचा मृत्यू होतो. जवळजवळ चाळीस वर्षानंतर एका युवा जोडप्याला एका शेतात एक मूल सापडते ज्याचे नाव आलोक ठेवले जाते.

लहानपणापासून हा आलोक समवयस्क मूलांपेक्षा जास्त बुद्धीवान असतो. कुटुंबाचा फॅमिली डॉक्टर आणि मुलाचे शिक्षक त्याच्यावर लक्ष ठेवून असतात कारण त्यांना हा मुलगा विशेष आहे हे कळून चुकते. कथानक पुढे सरते तसे हा मुलगा एक परग्रहवासी आहे याचा उलगडा हळूहळू होत जातो. पुढे आलोक काय व कशासाठी करतो हे अत्यंत सुंदर पद्धतीने लिहिले आहे.

सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक उत्कंठा वाढवणारे आहे. एकदा वाचायला सुरुवात केली मग सहज सोडवत नाही. लेखकाने उत्तम प्रकारे विषयाची मांडणी केली आहे. साध्या भाषेचा प्रयोग केल्याने वाचावयास कठीण जात नाही. चुकवू नये असे हे पुस्तक मुद्दामहून वाचा. नक्की आवडेल यात शंका नाही. 

Spread the love

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *