प्रेषित


यावर्षी वाचून आवडलेलं हे दुसरं थरारक पुस्तक. खरं तर ही एक विज्ञानकथा आहे. पण प्रत्येक पानागणिक आपली उत्कंठा वाढवणारे आहे. सदतीस वर्षांपूर्वी ही कथा लिहिली आहे यावर विश्वासच बसत नाही. आपल्या काळाच्या मानाने लेखकाचे विचार व कल्पकता कितीतरी पुढे होती याची जाणीव हे पुस्तक वाचताना होते.एक वैज्ञानिक, प्रिंगल, अवकाशात अजून कुठे जीवसृष्टी आहे का याचा शोध लावतोय. ते सुद्धा लपून छपून मिलिटरीच्या यंत्रणेने. एका अपघातात त्याचा मृत्यू होतो. जवळजवळ चाळीस वर्षानंतर एका युवा जोडप्याला एका शेतात एक मूल सापडते ज्याचे नाव आलोक ठेवले जाते.

लहानपणापासून हा आलोक समवयस्क मूलांपेक्षा जास्त बुद्धीवान असतो. कुटुंबाचा फॅमिली डॉक्टर आणि मुलाचे शिक्षक त्याच्यावर लक्ष ठेवून असतात कारण त्यांना हा मुलगा विशेष आहे हे कळून चुकते. कथानक पुढे सरते तसे हा मुलगा एक परग्रहवासी आहे याचा उलगडा हळूहळू होत जातो. पुढे आलोक काय व कशासाठी करतो हे अत्यंत सुंदर पद्धतीने लिहिले आहे.

सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक उत्कंठा वाढवणारे आहे. एकदा वाचायला सुरुवात केली मग सहज सोडवत नाही. लेखकाने उत्तम प्रकारे विषयाची मांडणी केली आहे. साध्या भाषेचा प्रयोग केल्याने वाचावयास कठीण जात नाही. चुकवू नये असे हे पुस्तक मुद्दामहून वाचा. नक्की आवडेल यात शंका नाही. 

Manat – Book Review

मनात

मानसशास्त्र हा असा विषय आहे ज्याच्यावर एवढी वर्षे दुर्लक्ष होत होते. पण जसजसा काळ बदलला, जीवनशैली बदलली तसे याला महत्त्व मिळत गेले. मला मानसशास्त्राविषयी खूपच ओढ. लोकांच्या नकळत त्यांचे बोलणे, त्यांचे हावभाव यांचे निरीक्षण करत असतो. एवढं असूनही या विषयावर कधी वाचन केले नाही.

मनात हे पुस्तक सामान्य माणसाला मानसशास्त्राची माहिती देण्यासाठी लिहिले गेले. मानसशास्त्राचे वेगवेगळे पैलू यात मांडले आहेत. भाषा रंजक ठेवण्याचा लेखकाने अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पण सुरुवातीच्या काही प्रकरणानंतर तोचतोचपणा जाणवतो. प्रत्येक प्रकरण एकाच साच्यात घालून तयार केले आहे असे वाटते. मधल्या पानांत तर मानसशास्त्र सोडून मानसशास्त्रज्ञांच्या जीवनाविषयी जास्त पाने खर्च केली आहेत. यामुळे सुरुवातीला आपले लक्ष वेधून घेणारे हे पुस्तक नंतर नंतर कंटाळवाणे होऊ लागते. असे असूनही या पुस्तकात मानसशास्त्राविषयी प्रचंड माहिती दिली आहे. जवळपास या विषयाचा संपूर्ण इतिहास संक्षिप्त स्वरूपात मांडला आहे.

ज्यांना मानसशास्त्राची आवड आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक एक पर्वणीच. बाकीच्यांना हे कंटाळवाणे वाटण्याची संभावना आहे. वाचायचं ठरवलंच तर हळूहळू वाचा. कारण यात घेण्यासारखे खूप काही आहे.

माझी जन्मठेप

गेली कित्येक वर्षे मला हे पुस्तक वाचावेसे वाटत होते. या संचारबंदी मुळे हा योग जुळून आला. शरद पोंक्षेच्या नावाने एक संदेश फिरवला जात होता जिथे ते म्हणत की या संचारबंदीत “माझी जन्मठेप” वाचायला घ्या. ठरवले. पण पुस्तक माझ्याकडे नव्हते. आता काय? तेव्हाच लक्षात आले की काही दिवसांपूर्वी मला या पुस्तकाचे ध्वनिमुद्रण केलेले युट्यूब लिंक सापडले. ते ऐकायला सुरू करताच सावरकरांच्या संकेतस्थळावर पीडिएफ पण सापडले. ध्वनिमुद्रित केलेले पुस्तक वाजवून आणि पुढे पीडिएफ ठेवून ते वाचू लागलो.

एका व्यक्तिच्या आयुष्यात किती हे त्रास? किती म्हणून एका माणसाची सहनशक्ती? हे दोन प्रश्न सर्वात आधी माझ्या मनात आले. पुस्तकाच्या पहिल्या पानापासून जी पीडा कथित केली आहे ती शेवट पर्यंत तशीच आहे. कधी कधी थोडी मात्रा वर खाली होते. पण शून्य कधीच नाही. सावरकरांनी दहा वर्षे अंदमानात अपार शारीरिक आणि मानसिक यातना सहन केल्या. जिथे एका बाजूला धडधाकट व्यक्ती या यातना सहन न होवून वर्ष दोन वर्षांतच आत्महत्या करीत किंवा त्यांचा मृत्यू होई तिथे दहा वर्षे काढणे एक चमत्कारच.
हे सगळं सहन करण्यामागे एकच गोष्ट कारणीभूत. ती म्हणजे प्रचंड राष्ट्रप्रेम. आपल्या राष्ट्रासाठी जगावे, स्वातंत्र्य मिळवून राष्ट्राची प्रगती करावी हे ध्येय. समाजात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी कारागृहात असतानाच प्रयत्न सुरू केले. कैद्यांना शिक्षण, वाचनाची आवड निर्माण करणे, राजकारणाची समज. शुध्दिकरण इ. यासारखे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. बहुतांश वेळा त्यांना या उपक्रमात यश सुध्दा मिळाले.

पुस्तक वाचताना सावरकरांच्या चिवट इच्छाशक्तीची आणि मनोधैर्याची जाणीव होते. खून, दरोडा घातलेल्यांना, आपल्या नंतर कारावास झालेल्यांना लवकर सुटका मिळल्यावर काय वाटत असेल त्यांना? सर्व बदिंना काही ना काही सुट मिळत असे पण त्यांना नाही. अगदी अंदमानातून सुटका झाल्यानंतर सुध्दा भारतात तीन वर्षे कारावास सहन केल्यानंतर सुटका झाली.

शेवटी शेवटी अजून एक गोष्ट जाणवली की भारताने एक दूरदृष्टी असलेल्या या नेत्याला म्हणावे ते स्थान आणि महत्व दिले नाही.

आता संचारबंदी लागू असताना हे पुस्तक वाचल्याने त्याचा वेगळा प्रभाव पडला. आपण जे सहन करतोय ते काहीच नाही असे वाटू लागले. मराठी वाचता येत असेल तर नक्कीच वाचा. तुमचा दृष्टिकोन बदलणारे पुस्तक ठरेल हे.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा २०२०

गुढीपाडव्याच्या व शार्वरी नाम संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षात तुम्हाला उत्तम यश व आरोग्य लाभो ही सदिच्छा.

अनेकांना या शुभेच्छा पोकळ वाटत असतील. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना विषाणूने उत्थान मांडला आहे. असे आहे तर नवीन वर्ष शुभ कसे काय?

मला वाटते ही एक संधी आहे. जसा तुमचा मोबाईल प्रतिसाद द्यायला उशीर करू लागला की कधीकधी तुम्ही “रीसेट” करता, अगदी तसेच.

म्हटले जाते की कुठलीही गोष्ट तुम्ही २१ दिवस सलग केली तर तिची सवय होते. तुमच्याकडे २१ दिवस आहेत चांगली सवय लावण्यासाठी. सकाळी लवकर उठायची(हा प्रयत्न मी करतोय), दिवसातून एकदा प्रार्थना करायची, योगा करायची, पुस्तक वाचायची किंवा जे तुम्ही एवढी वर्षे मनांत ठेवून होता की “मला वेळ मिळाला की मी हे करेन”, ते करण्याची ही एक संधी आहे. २१ दिवस आहे तुमच्याकडे. वाया घालवू नका.

तुम्ही जे काही चांगले करण्याचा प्रयत्न करणार त्यासाठी माझ्या वेगळ्या शुभेच्छा. हसत रहा. आनंदी रहा.